विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा सवाल
अतिवृष्टी होऊन 15 दिवस उलटले तरी महसूल प्रशासनाकडून शेतातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले नाहीत. त्यामुळे शेतकरी मेल्यावर सरकार मदत करणार का?, असा सवाल उपस्थित करत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी दरेकर हे जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहे, याप्रसंगी ते बोलत होते.
सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या शेतातील मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, मका , बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले. लाखो हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट झाली. राज्य सरकारने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. पण पंधरा दिवस उलटून गेले तरी सुद्धा अद्यापपर्यंत प्रशासनाने पंचनामे केलेले नाहीत. विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांनी आज चौका, फुलंब्री या गावाला भेटी दिल्या. दरेकर यांनी शेतात जाऊन शेतकर्यांशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली. विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर हे आज पीक पाहणीला येणार म्हणून चौका, फुलंब्री गावात घाईघाईने गुरुवारी पंचनामे करण्यात आले असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. अजून बर्याच शेतकर्यांचे पंचनामे झाले नसल्याचेही काही शेतकर्यांनी सांगितले. तसेच काही शेतकर्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा काढला आहे. पण पीक विम्याची रक्कम जास्त असल्याने अनेक शेतकर्यांनी पीक विमा काढणे परवडत नसल्याचे यावेळी दरेकरांना सांगितले. पीक विमा कंपन्यांनी शेतकर्यांना विम्याची रक्कम त्वरित द्यावी, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. दरेकर यांच्या या दौर्याप्रसंगी आ. हरिभाऊ बागडे, खा. डॉ. भागवत कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, राज वानखेडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण, सुहास शिरसाठ आदींची उपस्थिती होती.
8 विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज फुलंब्री तालुक्यातील चौका गावातील शेत पिकांची पाहणी केली. शेतकर्यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेले पीक दरेकर यांना दाखविले.